राज्यामध्ये होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीआधी महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडत आहेत. काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे वर्षा गायकवाड यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वर्षा गायकवाड यांचा उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून विजय झाला होता, त्यामुळे त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील 7 विद्यमान आमदारांचा विजय झाला. यात प्रणिती शिंदे, बळवंत वानखेडे, रवींद्र वायकर, वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, संदीपान भुमरे, कल्याण काळे यांचा समावेश होता, त्यामुळे या आमदारांना त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे.
आमदारांच्या राजीनाम्यामुळे विधान परिषद निवडणुकीचा कोटाही कमी होणार आहे. महाराष्ट्रातल्या 288 आमदारांची संख्या आता 14 ने कमी झाल्यामुळे 274 झाली आहे. लोकसभेत निवड झाल्यामुळे 7 आमदार राजीनामा देणार आहेत, तर निवडणूक काळात अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना आणि राजू पारवे यांनी शिवसेनेत प्रवेश करताना आमदारकीचा राजीनामा दिला. तर सुनिल केदार हे अपात्र झाले आहेत, तर 4 आमदारांचं निधन झालं आहे, त्यामुळे ही संख्या 14 ने कमी झाली आहे.
