महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत विद्यार्थ्यांना शाळेतच पास वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता तासिका बुडवून पासकरिता रांगेत उभे राहावे लागणार नाही. जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी, विद्यार्थिनींना याचा लाभ होणार आहे.
एका गावातील विद्यार्थ्यांना दुसऱ्या गावातील शाळांमध्ये जाण्यासाठी शासनाने एसटीच्या माध्यमातून तिकिटात सवलत दिली आहे. केवळ 33 टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक प्रवास पास काढता येतो. शिवाय, शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजने अंतर्गत पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत पासचे वितरण केले जाते. पास घेण्यासाठी किंवा काढण्यासाठी विद्यार्थ्यांना घरून लवकर निघावे लागते, ते शक्य नसल्यास शाळेतील काही तासिका बुडवाव्या लागतात.
यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती असते. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळानं मोठा निर्णय घेतला आहे. आता शाळेतच पास मिळणार असल्याने विद्यार्थ्यांची धावपळ थांबण्यासोबतच पूर्णवेळ तासिकेला हजर राहाता येणार आहे. यापूर्वी दरमहा विद्यार्थी, विद्यार्थिनींना बसस्थानकावर येऊन रांगेत उभे राहून किंवा गटागटाने जाऊन आगार व्यवस्थापनाकडून पास घ्यावा लागत होता. मात्र महामंडळाच्या निर्णयाने या त्रासापासून त्यांची सुटका होणार आहे.
