वेळ आलीच! मी अजित आशा – अनंतराव पवार, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अनेकदा मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली. मात्र, उपमुख्यमंत्रीपदावर सर्वाधिक वेळा विराजमान होण्याच रेकॉर्ड अजित पवार यांच्याच नावावर आहे.

प्रशासकीय यंत्रणेवर मजबूत पकड असलेले अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. अनेकदा भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे बॅनर्स देखील झळकले आहेत. याचीच पुनरावृत्ती पिंपरी चिंचवडमध्ये पाहायला मिळाली.

अजित पवार (NCP Ajit Pawar) यांचा उद्या म्हणजेच २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. तत्पुर्वी आज पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजितदादांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. इतकंच नाही, तर कार्यकर्त्यांनी यावेळी अनोखा केक देखील आणला.

या केकवर ‘मी अजित आशा – अनंतराव पवार, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की …’ अशा आशयाचा मजकूर देखील छापण्यात आला होता. हा केक आपल्या लाडक्या नेत्याने कापावा, अशी इच्छा कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.

अखेर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अजित पवार यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. तसेच त्यांनी केकचा तुकडा देखील खाल्ला. केकवरील मजकूर वाचून अजित दादांच्या चेहऱ्यावरील उमटलेले स्मित हास्य देखील लपून राहिले नाही.

यावेळी काही कार्यकर्त्यांनी अजित पवार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अशा घोषणा देखील दिल्या. अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरात शुभेच्छांचे बॅनर्स लागले आहेत. तरुण कार्यकर्त्यांसह पदाधिकारी तसेच नेत्यांनी अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Comment