भाजपचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते माधवराव किन्हाळकर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. किन्हाळकर यांच्या शरद पवार यांच्या गटात प्रवेश करण्याने भाजपला हा मोठा दणका मानला जात आहे.
शनिवारी (ता.20) पुण्यातील एका कार्यक्रमात शरद पवार यांच्या उपस्थितीत किन्हाळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 9 जुलैलाच किन्हाळकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दिला होता.
शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करताना किन्हाळकर यांनी भाजपवर थेट देशद्रोहाचे आरोप केले आहेत. “मी ज्या भाजपमध्ये सामील झालो होतो तो भाजप आणि आजच्या भाजपमध्ये खूप फरक आहे. भाजप नेते आज राष्ट्रवाद, लोकांचे प्रश्न, अगदी सिंचनावर बोलत असले तरी त्यांचे कार्य राष्ट्रहिताला नव्हे तर देशद्रोहाला चालना देत असते.” असा आरोप किन्हाळकर यांनी केला आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनीदेखील भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच माजी मंत्री माधवराव किन्हाळकर यांनीही भाजपला रामराम ठोकला. सुर्यकांता पाटील यांच्या पाठोपाठ माधवराव किन्हाळकर यांनीदेखील शरद पवार यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवत शरद पवारांचा पक्षात प्रवेश केला.
