पुणे – लोणीकंद येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून खून केला. यानंतर पती दिवसभर मद्यपान करुन घरातच झोपला होता. ही धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली.
याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी पतीला अटक केले आहे. लक्ष्मीबाई बाबासाहेब जाधव (४४) असे मृत महिलेचे नाव आहे. तर बाबासाहेब जाधव (५४, रा.बुर्केगाव) असे आरोपीचे नाव आहे.
लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, बाबासाहेब याचा वेल्डींगचा व्यवसाय आहे. तर लक्ष्मीबाई एका कंपनीत कामाला जाते. दोघांमध्ये कौटुंबिक वाद होते. बाबासाहेब लक्ष्मीबाईच्या चारित्र्यावर संशय घेऊन अनेकदा मारहार करायचा. दरम्यान सोमवारी रात्री एकच्या सुमारास त्यांच्यात पुन्हा वाद झाला. तेव्हा रागाच्या भरात बाबासाहेबाने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन तीचा खून केला.
यानंतर तो मद्यपान करुन घरातच झोपला. दरम्यान लक्ष्मीबाई आणि तीची विवाहित मुलगी एकाच कंपनीत काम करतात. लक्ष्मीबाई घरुन निघताना नेहमी मुलीला फोन करायची. मात्र मंगळवारी ती कंपनीत कामाला आली नाही तसेच फोनही उचलत नव्हती. यामुळे दुपारी जेवणाच्या सुट्टीमध्ये मुलगी घरी आली. तेव्हा घराचा दरवाचा आतून बंद होता.
बऱ्याचदा वाजवूनही तो उघडला जात नव्हता. यामुळे मुलीने घराचा दरवाजा ढकलून तोडला. तेव्हा आई रक्ताच्या थारोळ्यात मृत पडलेली दिसली तर वडिल शेजारीच दारुच्या नशेत झोपलेले दिसले. तीने तातडीने पोलिसांना याची खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन बाबासाहेबाला ताब्यात घेतले. त्याच्या तपासात त्याने खूनाची कबुली दिली.
