काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सिन्नर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करावी, यासाठी सिन्नर काँग्रेस समितीने एकमुखी ठराव केला आहे. त्यामुळे सिन्नरच्या पारंपारीक राजकारणाला मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून सिन्नर मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात यावा, अशी विनंती करणारा ठराव करण्यात आला. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या भूमिकेने सिन्नरच्या राजकारणात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक नवे वळण निर्माण होण्याची शक्यता आहे.
सिन्नरच्या शासकीय विश्रामगृहात पदाधिकाऱ्यांची बैठक तालुका अध्यक्ष विनायक सांगळे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्यात यंदा महायुतीच्या सरकार विरोधात मतदार आणि शेतकरी वर्गात मोठा असंतोष आहे.
सिन्नरचे अनेक प्रश्न विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांनी सोडवलेले नाहीत. सातत्याने सत्तेच्या बाजूने ते राहिले आहेत. अशा स्थितीत सिन्नर हा काँग्रेसचा पारंपारिक विधानसभा मतदारसंघ आहे, त्यामुळे तेथे पक्षाचा उमेदवार द्यावा असा दावा कार्यकर्त्यांनी केला. आमदार थोरात यांनी सिन्नर मधून विधानसभा उमेदवारी करण्याची तयारी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सिन्नर मतदारसंघातून २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून आमदार माणिकराव कोकाटे निवडून आले. मात्र त्यांनी शरद पवार गटाला सोडचिट्टी दिली. ते उपमुख्यमंत्री अजित पवार गटात सामील झाले. त्यामुळे देखील काँग्रेस पक्षाने ही भूमिका घेतली असावी, असे बोलले जाते.
आमदार कोकाटे यांनी कधीही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सन्मान जनक वागणूक दिलेली नाही. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कधीही विश्वासात घेतलेले नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाने आपल्या हक्काचा असलेला हा मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे घ्यावा. येथून ज्येष्ठ नेते थोरात यांना उमेदवारी जाहीर करावी.
याबाबत वरिष्ठ नेत्यांकडे पाठपुरावा केला जोणार आहे. याबाबतचा ठराव प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पाठविण्यात आला आहे, असे श्री सांगळे यांनी सांगितले. सिन्नरच्या राजकारणात मतदारांकडून सातत्याने पक्षापेक्षा उमेदवाराला महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसने टाकलेला हा डाव सिन्नरच्या राजकारणात नवीन ट्विस्ट निर्माण करू शकेल.
महाविकास आघाडी कडून सध्या सिन्नर मध्ये निवडणुकीची तयारी केली जात आहे. यामध्ये राजाभाऊ वाजे लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार कोणय़ असा प्रश्न आहे. सध्या महाविकास आघाडी कडून शिवसेना ठाकरे गटाने या मतदारसंघावर दावा केला आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाने प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. या मतदारसंघात सातत्याने शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार राजाभाऊ वाजे विरूद्ध आमदार माणिकराव कोकाटे अशी चुरस असते. या स्थितीत काँग्रेसने टाकलेल्या गुगलीने शिवसेना ठाकरे गट आणि खासदार राजाभाऊ वाजे दोघांचीही चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे.
