शिर्डी – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यास थोडाच कालावधी शिल्लक आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये ही निवडणूक होण्याची दाट शक्यता असून महायुतीमध्ये आतापासूनच फटाके फुटण्यास सुरुवात झाली आहे. तसेच जागावाटपावरून भारतीय जनता पक्षातील अंतर्गत कलह समोर आला आहे. या दरम्यानच शिर्डीतून राजकारणात एक खळबळ उडवून देणारी बातमी समोर आलीय. शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याविरोधात थेट भाजपच्याच राजेंद्र पिपाडा यांनी दंड थोपटले आहेत.
राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याविरोधात जनतेत प्रचंड नाराजी आणि रोष आहे. त्यामुळे ते निवडून येणार नाही असे जनतेचे ठाम मत आहे. त्यामुळे शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा लोकांचा आग्रह आहे. जनतेच्या इच्छेला मान देत आपण शिर्डीतून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे भाजप नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी पत्रकार परिषदेतेत म्हटलय.
तसेच उमेदवार बदलला तरच जागा वाचेल. त्यामुळे शिर्डी मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी वरिष्ठांकडे करणार आहे. या मतदारसंघात वर्षानुवर्ष सत्ताकेंद्र एकाच कुटुंबात असल्याने जनतेमध्ये नाराजी आहे. याआधीही आपण विखे यांच्याविरोधात निवडणूक लढली होती. 11 फेऱ्यांपर्यंत 13 हजार मतांनी आघाडीवरही होतो. पण थोडक्यात पराभव झाला. त्यानंतरच्या निवडणुकीत पक्षशिस्त पाळत निवडणूक लढलो नाही. मात्र आता येथून उमेदवारी मिळावी यासाठी वरिष्ठ नेत्यांना भेटणार असल्याचेही पिपाडा म्हणाले.
यानंतर नगर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या दोन्ही खासदारांच्या सत्कार सोहळ्यात भाजप नेते राजेंद्र पिपाडा यांनी हजेरी लावली. ते काँग्रेसच्या स्टेजवर दिसल्याने आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालीय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून राजेंद्र पिपाडा यांची ओळख आहे. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे. मात्र त्यातच आता राजेंद्र पिपाडा हे बाळासाहेब थोरात यांच्यासोबत दिसून आल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात 2009 साली राजेंद्र पिपाडा यांनी निवडणूक लढवली होती. आता देखील त्यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे. मात्र या मागणीनंतर पिपाडा हे थेट विखे पाटलांचे कट्टर विरोधक बाळासाहेब थोरात यांच्या सोबत दिसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र पिपाडा हे महाविकास आघाडीच्या जवळ जात आहे का? येणाऱ्या काळात राजेंद्र पिपाडा नेमका काय निर्णय घेणार? राजेंद्र पिपाडा भाजपची साथ सोडणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
