भाजपचे शिवाजी कर्डिले ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता?

अहमदनगर : भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी राहुरी आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघावर दावा असणारे माजी आमदार शिवाजी कर्डीले (Shivaji Kardile) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

लोकशाही आहे, त्यामुळे लोकशाहीत प्रत्येकाला इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मात्र, याबाबत पक्ष निर्णय घेईल, असे शिवाजी कर्डीले यांनी म्हटले. या सगळ्या घडामोडीनंतर शिवाजी कर्डीले हे श्रीगोंदा विधानसभा (Shrigonda assembly constituency) मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशीही चर्चा सुरू आहे.

सुजय विखे-पाटील यांनी राहुरीतून लढण्याचा मनोदय व्यक्त केल्याने कर्डिले यांची कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. तसेच यामुळे कर्डिले-विखे हा वाद पु्न्हा उफाळून येण्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, या सगळ्याबाबत शिवाजी कार्डिले यांना विचारणा केली असता त्यांनी म्हटले की, पक्षाने आदेश दिल्यास कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची माझी तयारी आहे.

मला पैलवानकीचा छंद आहे. त्यामुळे पैलवानाला बाराही महिने व्यायाम करावा लागतो, तरच तो फडात यशस्वी होतो. तसेच मी एक निवडणूक संपली की पुढच्या निवडणुकीची तयारी करतो, असेही कर्डीले म्हणाले. दरम्यान श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे बबनराव पाचपुते हे आमदार आहेत. याच मतदारसंघातून शिवाजी कर्डीले यांचं नाव समोर येत असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Leave a Comment