लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाच्या निलेश लंके यांनी सुजय विखे-पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर आता सुजय विखे हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. संगमनेर (Sangamner) किंवा राहुरी (Rahuri) विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची त्यांची तयारी असून पक्षाकडे याबाबत इच्छा व्यक्त केल्याची माहिती सुजय विखे पाटील यांनी दिली होती. सुजय विखे पाटील हे संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिले तर त्याचा थेट सामना बाळासाहेब थोरात यांच्या रंगू शकतो.
संगमनेर विधानसभेत बाळासाहेब थोरात हे सध्या विद्यमान आमदार आहेत. तर सुजय विखे यांनी राहुरी विधानसभा लढवल्यास प्राजक्त तनपुरे विरूद्ध सुजय विखे अशी लढत होईल. सुजय विखे राहुरीतून विधानसभेच्या रिंगणात उतरल्यास शिवाजी कार्डिले यांनी पर्यायी मतदारसंघ म्हणून श्रीगोंदा मतदारसंघाकडे मोर्चा वळवल्याची चर्चा आहे. मात्र, कार्डिले श्रीगोंद्यात आल्यास बबनराव पाचपुते काय करणार, याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
