अबब! ३ लाखाची लाच घेताना सरपंचाला अटक

नागपूर : काटोल तालुक्यातील मूर्ती येथील ग्रामपंचायतचे भाजपचे सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मोहन जगन्नाथ मुन्ने (वय ५४) यांना लँड डेव्हलपर्सकडून ३ लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अटक केली.

मुन्ने यांनी लँड डेव्हलपर असलेले परेश वैकुंठराव शेळके (वय ३९) रा. नबिरा महाविद्यालय जवळ धंतोली काटोल, यांच्याकडे ५ लाख रुपयांची लाच मागितली होती. यातील १ लाख रूपये आधी स्वीकारले व नंतर ३ लाख देण्याचे तडजोडीत ठरले. मात्र यावेळी सरपंच जाळ्यात अडकले. नवीन घराच्या बांधकाम परवानगीसाठी ही रक्कम मागितली होती. ही रक्कम परेश शेळके यांच्याकडून मोहन मुन्ने यांनी स्वीकारून ती एका पिशवीत कारमध्ये ठेवली होती. यावेळी दोन्ही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, अप्पर अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण लाकडे यांच्या नेतृत्वाखाली सारंग बालपांडे, अस्मिता मेश्राम, विकास सायरे, गीता चौधरी, प्रफुल बांगडे, राजू जांभूळकर यांनी ही कारवाई केली.

Leave a Comment