महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी सायंकाळी ते बीड शहरात पोहचणार होते. मनसैनिक राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी थांबले होते. मात्र, शहरात दाखल होताना मोठ्या जमावाने राज ठाकरे यांचा ताफा अडविला आणि राज ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली.
या प्रकरणावर मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी सूचक विधान केलं आहे. ‘राज ठाकरेंचा ताफा मराठा आंदोलकांना आडवू नये’ असं आवाहन करताना त्यांनी राज ठाकरेंनाही अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरेंचा ताफा आडवला जात असल्याच्या संदर्भात जरांगे पाटलांना प्रश्न विचारण्यात आला.
त्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले ‘कोणतंही आंदोलन राज्यात सुरु नाही त्यामुळे राज ठाकरेंना आडवू नये असं आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे. मराठ्यांनी आडवायचं ठरवलं, जाब विचारायचं ठरवलं तर मराठे मुंबईत जाऊन गचांडी धरुन यांना जाब विचारु शकतो एवढा विश्वास मला आहे.
ते तुम्हाला दिसेल. आता बऱ्याच जणांना मराठ्यांची ताकद कमी झाली की काय? मराठ्यांना पाठिंबा आहे की नाही? मुंबईत सुद्धा किती मराठा आहेत दाखवतो,” असं आव्हानच त्यांनी दिलं आहे.
मात्र, आता मनोज जरांगेंच्या या विधानावर राज ठाकरेंनी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना मनोज जरांगे यांच्या विषयी प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले, ‘मुळात पहिली गोष्ट लक्षात घ्या, हे त्यांनी पाठवलेली माणसं न्हवती आणि कोण माणसं होती हे तुम्हाला आधीच सांगितलं आहे.
आपण का सारखं तेच तेच बोलतो ये, उगाच मी इथे बसलो म्हणून तुम्ही मला सारखं प्रश्न विचारता का… मी तुम्हाला आधीच सांगितलं हे त्यांच्या बरोबरचे आंदोलन करते न्हवते, हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे माणस आहेत’. असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
