राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. येत्या काळात कोणत्याही क्षणी निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यातच निवडणूक आयोगाने दोन राज्यांच्या निवडणुका जाहीर केल्या. मात्र, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर करण्यात आलेली नाही.
राज्यातील निवडणूक दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात निवडणुकीची घोषणा होऊ शकते. तत्पूर्वी राज्यात सध्याच्या घडीला निवडणूक झाली तर कोणाला किती जागा मिळतील? कोणाला किती टक्के मते मिळतील, याबाबतचा नवा सर्व्हे समोर आला आहे.
आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीच्या रिंगणात महाविकास आघाडी (MVA), महायुती, मनसे (MNS) आणि तिसरी आघाडीही उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे सर्व पक्ष निवडणूक लढविणार असल्याने मतविभाजनाचा फटका कोणाला ? बसणार याची उत्सुकता लागली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले होते तर महायुतीला दारुण पराभव स्वीकारावा लागला होता.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी होणार असली तरी राज्यातील वातावरण गेल्या काही दिवसापासून महायुतीच्या विरोधात आहे, त्यामुळेच निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यातच इंडिया टुडे-सी व्होटर्सच्या ‘मुड ऑफ नेशन’ सर्व्हेनुसार राज्यात सध्याच्या घडीला निवडणूक झाली तर कोणाला किती जागा मिळतील? कोणाला किती टक्के मते मिळतील, याबाबतचा अंदाज या सर्व्हेतून वर्तविण्यात आला आहे.
या सर्व्हेनुसार, महाविकास आघाडीला 150 ते 160 जागा मिळू शकतात. तर महायुती 120 ते 130 जागा मिळतील, असा अंदाज आहे. मतांची टक्केवारी पाहिली असता महायुतीला 42 टक्के मते मिळू शकतात तर महाविकास आघाडीला 44 टक्के मते मिळतील, असा अंदाज आहे.
