मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यासाठी ठाकरेंचा आग्रह, कॉंग्रेसने तीन वाक्यात विषय संपवला

राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election) सत्ताधारी महायुतीसह महाविकास आघाडीकडून सुद्धा जोरदार तयारी सुरू आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुतीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असतानाच महाविकास आघाडीने निवडणुकीसाठी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

उद्धव ठाकरेंकडून सीएम पदाचा उमेदवार जाहीर करण्यासाठी आग्रह

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर जरी नाही केला तरी चालेल, पण बंद खोलीत का असेना मुख्यमंत्रीपदावर चर्चा व्हावी जेणेकरून ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री या निर्णयाने कोणी कोणाचे आमदार पाडण्याचा प्रयत्न करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदावरून चर्चा जाहीरपणे करताना जो कोणी उमेदवार असेल त्याला जाहीर करा, माझा त्याला पाठिंबा राहील अशी भूमिका घेतली आहे.

सध्या तरी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून कोणतीही चर्चा नको

मात्र त्यांच्या भूमिकेवर महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आणि काँग्रेसकडून सावध भूमिका घेतली जात आहे. पहिल्यांदा काँग्रेसकडून या प्रश्नाला बगल देण्यात आल्यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसकडून या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. महाविकास आघाडीमध्ये सध्या तरी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून कोणतीही चर्चा नको अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे काँग्रेस नेत्यांच्या या भूमिकेकडे कसे पाहतात आणि ते कोणता प्रतिसाद देणार याकडे लक्ष असेल. विधानसभा निवडणुकीसाठी एकत्रित सामोरे जाऊ आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेऊ अशी भूमिका काँग्रेसने त्यांनी मांडली आहे.

Leave a Comment