नाशिक – पुणे महामार्गालगत ‘या’ ठिकाणी भीषण आग 

नाशिकरोड – नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik Pune Highway) असलेल्या शिंदे गाव येथील औद्योगिक वसाहतीतील एका फटाक्याच्या गोदामाला भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, देवळाली गावातील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत शिवलाल विसपुते यांचा मुलगा गौरव विसपुते यांच्या मालकीच्या शिंदे गाव नायगाव रोड येथे श्री स्वामी समर्थ नावाचे फटाक्यांचे गोदाम आहे. आज मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास आकाशात धूर दिसू लागल्याने व फटाक्यांच्या आवाजामुळे रहिवाशांच्या आग लागल्याचे लक्षात आले.

त्यानंतर सदर घटनेची माहिती तात्काळ नाशिकरोड अग्निशामक केंद्र व नाशिकरोड पोलिसांना देण्यात आली. यानंतर आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Leave a Comment