माजी खासदार सुजय विखे विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेर विधानसभा मतदारसंघाकडे सुजय विखेंचा कल दिसतोय. यात त्यांचे वडील भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखेंनी सुजय विखे यांच्या निर्णयाला सपोर्ट केला आहे. तशी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
सुजय विखेंचा लोकसभा निवडणूक पराभव झाला. हा पराभव विखे परिवाराला चांगलाच जिव्हारी लागला आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी नगर जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. किंगमेकरच्या भूमिकते राहिलं. थोरातांमुळेच पराभव झाल्यानं, आता सुजय विखेंकडून त्यांना आव्हान उभं केलं जात आहे. यातून त्यांनी पक्षाकडे संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
सुजय विखे (Sujay Vikhe)यांच्या या निर्णयावर त्यांचे वडील मंत्री राधाकृष्ण विखे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ‘सुजय विखे निर्णय घेण्यास सक्षम आहेत. त्याला जो निर्णय घ्यायचा, तो त्यानं घ्यावा, आम्ही त्याच्या निर्णयाबरोबर आहोत’, असं राधाकृष्ण विखे यांनी म्हटलं. सुजय विखे यांच्या संगमनेर मतदारसंघातून निवडणूक लढण्याच्या या निर्णयाला राधाकृष्ण विखे यांनी एकप्रकारे ‘सपोर्ट’ केला आहे.
तसं पाहिल्यास संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांविरोधात सक्षम उमेदवार नाही. त्यामुळे सुजय विखेंबाबत निर्णय झाल्यास, लढत लक्षवेधी होईल, असं जाणकारांचं म्हणणं आहे. परंतु नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुजय विखेंबाबत बाहेरचा उमेदवार, अशी जी धारणा झाली होती, तशी संगमनेरमध्ये होऊ शकते, अशी भीती देखील व्यक्त केली जात आहे.
