आगामी विधानसभा निवडणूक जाहीर होण्यााआधीच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सहाव्यांदा उपोषणाला सुरुवात केली आहे.
तर दुसरीकडे पंढरपूरमध्ये आदिवासीतून आरक्षण द्या, या मागणीसाठी धनगर समाजातील नेते उपोषणाला बसले आहेत. यामुळे आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धनगर समाजाच्या मागणीनंतर आदिवासी आमदारांनी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. धनगर समाजाला आदिवासीमधून आरक्षण दिलं तर २५ आदिवासी आमदार आणि ४ खासदार राजीनामा देऊ, असा इशारा शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा यांनी दिला आहे. आमदार सुनील भुसारा यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, सुनील भुसारा यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. ‘धनगर समाजाला आरक्षण देण्याला आमचा अजिबात विरोध नाही. पण आदिवासीमधून आरक्षण देऊ नका ही आमची भूमिका आहे.
तुम्ही आदिवासीमधून आरक्षण दिलं तर सर्वपक्षीय २५ आदिवासी आमदार आणि ४ खासदार राजीनामा देऊ, मग रस्त्यावरची लढाई लढणार. आम्ही सोमवारी याबाबत बैठक घेऊन आमचा निर्णय होणार आहे, असा इशारा सुनील भुसारा यांनी दिला आहे.
