जालना : येथील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा सहाव्यांदा उपोषण सुरु केले आहे. सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी तसेच हैदराबाद सातारा आणि बॉम्बे गव्हर्मेंटचे गॅझेट लागू करावे यासह मराठा आंदोलकावरील आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी ते आठ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे.
मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाच्या पाचव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली होती. यानंतर लोकांनी त्यांना उपचार घेण्याची विनंती केली होती. मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील मनोज जरांगे यांना फोन करुन उपचार घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर मनोज जरांगे यांनी उपचार घेतले होते. मनोज जरांगे यांना डॉक्टरांकडून सलाईन लावण्यात आले होते.
मनोज जरांगेंची प्रकृती प्रचंड खालावली
यानंतर आता आठव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. त्यामुळे आंदोलक महिलांकडून पाणी घेण्याची आणि उपचार घेण्याची विनंती करण्यात येत आहे. मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यासाठी महिला आंदोलक रडताना दिसून आल्या. आता मनोज जरांगे पाटील उपचार घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
