ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणात बीड छत्रपती संभाजीनगर, मुंबई पुण्यातील शाखांमधून ठेवीदारांचे कोट्यवधी बुडवल्याचे आरोप असणाऱ्या या पतसंस्थेवर ईडीने कारवाई केली असून या चारही शाखांमधील तब्बल 95 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.जास्तीच्या व्याजाचे अमिष दाखवत फसवणूक केल्याचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेटचे राज्यात व राज्याबाहेर जाळे पसरलेले आहे. गेल्या वर्षभरापासून मल्टीस्टेट बंद असल्याने गुंतवणूकदारांचे पैसे अडकलेले आहेत. या मल्टीस्टेट घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार सुरेश कुटे यांची मागील महिन्यात ईडी कडून कसून चौकशी करण्यात आल्यानंतर व केंद्र सरकारने दिलेल्या निर्णयानंतर बीड, छत्रपती संभाजी नगर पुणे व मुंबई या शाखांमधील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
ईडीकडून एकूण १०२ कोटींची मालमत्ता जप्त
ईडीकडून आत्तापर्यंत एकूण 102 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली असून या चारही शाखांमधून जवळपास 95 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये या चारही शाखांमधील फ्लॅट, व्यावसायिक कार्यालय, प्लॉट अशी 85 कोटी 88 लाख रुपये किमतीची स्थावर मालमत्ता तसेच इतर मालमत्ता असे एकूण 95 कोटी एक लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेटचे संस्थापक सुरेश कुठे व इतरांविरुद्ध मनी लॉन्ड्रींगच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.
