महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या आढावा घेण्यासाठी राज्यात आलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाने शुक्रवारी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. याच चर्चेचा तपशील केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला.
राज्यातील एकूण मतदारांची संख्या, स्त्री आणि पुरूष मतदारांची संख्या तसेच नवमतदारांध्ये झालेली लक्षणीय वाढ याकडे त्यांनी लक्ष वेधले. राजकीय पक्षांनी कोणकोणत्या मागण्या केल्या, यासंबंधीही निवडणूक आयोग प्रमुख राजीव कुमार यांनी सविस्तरपणे सांगितले.
बहुतेक वेळा राजकीय पक्ष गुन्हे दाखल असलेली व्यक्ती उमेदवार म्हणून जाहीर करतात. हेच लक्षात घेऊन ज्यांच्या विरोधात कोणतीही क्रिमिनल केस सुरू असेल त्यांना तीनदा वृत्तपत्रात माहिती द्यावी लागेल, तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांत देखील जाहिराती द्यावी लागेल, अशा स्पष्ट शब्दात निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना बजावले आहे. तसेच संबंधित पक्षाला देखील आपण संबंधित व्यक्तीला उमेदवारी का दिली, हे सांगावे लागेल आणि त्यावरील गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दलची माहिती 3 दिवसांत सादर करावी लागेल, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
