शरद पवारांची मोठी घोषणा, मविआचे सरकार आले तर रोहित पवार हे…… 

रोहित पवार यांनी विधानसभा लढविण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मी त्याला सांगितले की कर्जत जामखेड हा दुष्काळी भाग आहे. तिथे काम करण्याची तुला चांगली संधी आहे. त्यामुळे रोहित पवार यांनी कर्जत जामखेडमधून विधानसभा निवडणूक लढवली.

रोहितची पहिली पाच वर्षे ही तुमची सेवा करण्यासाठी होती. आता पुढील पाच वर्ष रोहित महाराष्ट्राची सेवा करेन, असे वक्तव्य ज्येष्ठ नेते तथा मूळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. महाविकास आघाडीचे सरकार आले तर रोहित पवार हे मंत्री असतील, असेच शरद पवार यांनी अप्रत्यक्ष सांगितले. त्यांच्या घोषणेने रोहित पवार यांच्या समर्थकांमध्ये आनंदाची लाट आहे.

कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या विशेष प्रयत्नांतून जामखेड तालुक्यातील खर्डा येथे एकूण 25 कोटी 15 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज युवराज भूषणसिंहराजे होळकर, अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रोहित पवार यांनी गत पाच वर्षात केलेल्या कामाचे कौतुक केले. रोहित पवार हे मला मंत्री करा असे कधीही बोलले नाहीत. मीही पहिले पाच वर्ष मंत्री नव्हतो. 1972 नंतर मी मंत्री झालो. वसंत दादांच्या काळात मी मंत्री होतो. त्यांचे सरकार गेल्यानंतर मी मुख्यमंत्री झालो. रोहितने गत पाच वर्षे तुम्हा कर्जत जामखेडकरांची सेवा केली. आता पुढील पाच वर्षे रोहित महाराष्ट्राची सेवा करेन, असे पवार म्हणाले.

Leave a Comment