माढा विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे हे विद्यामान आमदार आहेत. विशेष म्हणजे ते गेल्या सहा टर्मपासून आमदार म्हणून निवडून येत आहेत. त्यामुळे त्यांची माढ्यात तितकी मोठी राजकीय ताकद आहे. बबनराव शिंदे यांना आता निवडणूक लढण्याची इच्छा नाही. त्यांना त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांना या निवडणुकीत उतरवायचं आहे. पण महायुतीत शिवसेनादेखील या मतदारसंघावर दावा करत आहे.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू या मतदारसंघात निवडणूक लढवण्याची तयारी आखत असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे बबनराव शिंदे हे शरद पवारांच्या भेटीगाठी घेत आहेत. विशेष म्हणजे बबनराव शिंदे यांनी त्याबाबतची मोठी घोषणा आज करुन देखील टाकली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांना हा मोठा राजकीय झटका आहे.
अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदेची मोठी राजकीय घोषणा केली. मुलाला तुतारी किंवा अपक्ष म्हणून निवडणुकीला उभं करणार, अशी घोषणा बबनराव शिंदे यांनी केली आहे. महायुतीचा विषय संपलाय असं म्हणत आमदार बबनराव शिंदे यांनी आपला मुलगा रणजितसिंह शिंदे तुतारी किंवा अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरवणार, अशी घोषणा केली.
“मी शरद पवारांच्या साथीने 38 वर्षे राजकारण करीत आलोय. त्यामुळे मी शरद पवारांची भेट घेतली आहे. शरद पवारांकडे तिकीटाची मागणी केली आहे. ते तिकीट देतील की नाही हे मला माहिती नाही. पण यंदाच्या निवडणुकीत माझा मुलगा रणजितसिंहला शरद पवारांनी तिकीट दिले तर ठिक, नाहीतर अपक्ष निवडणुकीला सामोरे जाईल”, अशी भूमिका बबनराव शिंदे यांनी मांडली.
