आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, आज मंगळवार (ता. १५) कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरींची शक्यता आहे. मुंबईसह पुण्यातही जोरदार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहणार असून तापमानात आणखीच घट होणार आहे.
पुढील दोन दिवस राज्यात उन्हाचा चटका कमी-अधिक होण्याची शक्यता आहे. कारण, हवामान विभागाने पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा अलर्ट दिला आहे. तर नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मराठवाड्यात देखील आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून अनेक जिल्ह्यांमध्ये वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहील, असं आयएमडीने सांगितलं आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची काळजी घ्यावी. तसेच काढणीला आलेली पिके झाकून ठेवावीत, असा सल्लाही देण्यात आला आहे
