महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल घोषित होतील. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबद्दलची मोठी घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच महाराष्ट्रात आचारसंहिताही लागू झाली आहे.
महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तर 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुकांची घोषणा केली जात नाही. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा होणार आहे. यंदा महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत.
महाराष्ट्रात 234 जनरल जागा आहेत. एसटी प्रवर्गासाठी 25 जागा आहेत. तर 29 जागा या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. त्यासाठी राज्यात ९ कोटी ६३ लाख मतदार मतदान करतील. त्यासाठी महाराष्ट्रात १ लाख १८६ निवडणूक केंद्र असतील. ग्रामीण आणि शहरी भागात मतदार केंद्र आहेत.
मतदानाच्या रांगेत काही खुर्च्या असतील, तशी व्यवस्था सगळ्या मतदान केंद्रवर असेल. 85 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मतदाराला घरातून मतदान करण्याचा अधिकार असेल. त्यासाठी आमचे अधिकारी त्यांच्या घरी जातील. सगळ्या मतदानाची व्हिडिओग्रफी केली जाईल. मतदानाचा टक्का वाढण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त करण्यात येईल. त्यासाठी वेगवेगळे मोबाईल अॅप उपलब्ध आहेत. ज्यांच्या नावावर क्रिमिनल रेकॉर्ड असेल, त्या उमेदवारांना पेपरमधे 3 वेळा जाहीरात द्यावी लागेल. सामान्य नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. 2 किलोमीटरच्या आत मतदान केंद्र असेल.
