संगमनेर(DSNews24/किरण पुरी) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेलं आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे. यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा प्रमुख सामना पाहायला मिळणार आहे. तसेच इतर पक्षही निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे निवडणूकीसाठी इच्छुक असलेले उमेदवार संबंधित नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यातच भारतीय नवजवान सेना पक्ष देखील विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उतरवणार असल्याची बातमी समोर आलीय. राष्ट्रीय अध्यक्ष संजय पडवळ यांनी याबाबत DSNews24 शी बोलताना माहिती दिलीय.
दरम्यान, दोन वेळा विधानसभा व लोकसभा निवडणूक लढविणारे संगमनेर तालुक्यातील साकूर येथील माजी नायब सुभेदार कलिराम बहिरू पोपळघट पुन्हा निवडणूक लढविणार असल्याची माहिती समोर आलीय. तसेच ते संगमनेर व पारनेर विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यामुळे कलिराम पोपळघट तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुक लढविणार आहे.
कलिराम पोपळघट हे भारतीय नवजवान सेना पक्षाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष आहे. तसेच त्यांनी २४ वर्ष भारतीय सेनेत सेवा केली आहे. १९९४ साली ते सेवानिवृत्त झाले आहे. त्यावेळी नायब सुभेदार म्हणून कार्यरत होते. त्यानंतर कुठेही नोकरी न करता फक्त नी फक्त समाजासाठी काहीतरी करायच म्हणून समाजसेवा सुरू केली. आजपर्यंत जवळपास ३० वर्षांपासून ते समाजसेवा करत आहे. गोरगरिबांसाठी कायमच ते धावून जात असतात.
याबरोबरच पोपळघट यांनी माजी सैनिकांचे प्रश्न मांडण्यासाठी विधानसभा किंवा लोकसभेत हक्काचा माणूस असावा यासाठी स्वतः निवडणूकीच्या रिंगणात उतरले. भारतीय नवजवान सेना पक्षाकडून २०१४ साली त्यांनी पहिल्यांदा संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. २०१९ ला याच मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती. तसेच भारतीय नवजवान सेना पक्षाकडून २०१९ लाच नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक लढवली. त्यानंतर पुन्हा याच मतदारसंघातून २०२४ लाही निवडणूक लढवली होती. आता पुन्हा कलिराम पोपळघट भारतीय नवजवान सेना पक्षाकडून संगमनेर व पारनेर अशा दोन विधानसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे कलिराम पोपळघट पुन्हा चर्चेत आले आहे.
तसेच राष्ट्रपती कोठ्यातून राज्यसभेवर माजी सैनिकांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी देखील कलिराम पोपळघट यांनी देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली होती
