संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या संकल्प सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या मुलीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले आहे.
जयश्री थोरात यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करण्यात आली आहे. वसंत देशमुख यांनी हे विधान केलं असून त्यावेळी सुजय विखे देखील मंचावर उपस्थित होते. यामुळे संगमनेर तालुक्यातील वातावरण पेटले आहे. या घटनेवरून महाविकास आघाडीतील नेत्यांकडून निषेध व्यक्त केला जात आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, ‘भाजपचा पटका गळ्यात घातलेले नेते पुरोगामी महाराष्ट्रात जाहीरपणे ‘तुमची मुलगी घराबाहेर पडू शकणार नाही’ अशी धमकी देतायत. हीच भाजपची मनुवादी मानसिकता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात महिलांबद्दल इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे नेते महिलांचे रक्षण काय करणार? निवडणूक जिंकणे हा भाजपचा एकमेव अजेंडा आहे. त्यासाठी ते किती खालची पातळी गाठू शकतात हे उघड झालंय.
शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे
सदर घटनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे भाजपाचे नेते वसंत देशमुख यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्रीताई थोरात यांच्या बाबतीत अतिशय गलिच्छ विधान केले. भरसभेत आपल्या मुलीच्या वयाच्या नेत्यावर अशा पद्धतीने गलिच्छ भाषेत टीका करण्यात आली, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. विशेष म्हणजे माजी खासदार सुजय विखे देखील या सभेला उपस्थित होते. त्यांनी देखील या विधानाचे अप्रत्यक्षरित्या समर्थन केले, असा निशाणा त्यांनी साधला आहे. शिवरायांच्या ज्या राज्यात महिलांकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यात येत होती. त्या राज्यात महिलांच्या बाबतीत अतिशय गलिच्छ भाषा वापरण्यात येत आहे. हे भाजपाचे संस्कार आहेत. या विधानाचा तीव्र निषेध त्यांनी व्यक्त केला आहे.
शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही एक्सवर पोस्ट टाकून यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझे मार्गदर्शक, माजी मंत्री श्री. बाळासाहेब थोरात यांची कन्या, माझी बहीण डॉ. जयश्रीताई यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह विधान करण्यात आलं, त्याचा तीव्र निषेध नोंदवतो! राजकारण होत राहिल, पण परस्त्रीला मातेसमान मानणारा छत्रपतींचा संस्कार त्यांच्याच महाराष्ट्रात पायदळी तुडवण्याचे काम काल झाले, ही बाब मनाला चीड आणणारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात जिजाऊंच्या लेकीचे भर सभेत चारित्र्य हनन होणे ही सबंध महाराष्ट्रासाठी दुर्दैवी घटना आहे. केवळ मतांवर डोळा ठेवून माझी लाडकी बहीण म्हणायचं आणि रणांगणात आव्हान उभं करणाऱ्या लेकीवर भर सभेत अश्लील शेरेबाजी करायची, तिला घराबाहेर पडू न देण्याची भाषा करायची हीच भारतीय जनता पार्टीची खरी वृत्ती आहे. महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता या वृत्तीला लवकरच महाराष्ट्रातून हद्दपार करेल.
