कराड : एका बाजूला लाडक्या बहिणींना पैसे, दुसरीकडे लेकीचा, सुनांचा अपमान करायचा असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी जयश्री थोरात यांच्यावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज अर्ज दाखल करत असून त्यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले, यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
25 ऑक्टोबरला अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमधील धांदरफळ येथे सुजय विखे-पाटलांच्या जाहीर सभेत एक अत्यंत वादग्रस्त विधान करण्यात आलं. सुजय विखेंचे समर्थक, भाजपचे नेते वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरातांबद्दल बोलताना पातळी सोडली. यानंतर काँग्रेस नेते आक्रमक झाले होते. दरम्यान, याप्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी जयश्री थोरात यांनी पोलीस स्थानक गाठलं होतं. त्यानंतर आता पृथ्वीराज चव्हाण यांनी यावरुन भाजपसह सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.
नगरला आपण पाहिलं काय झालं ते.. एका बाजूला 1500 रुपये द्यायचे आणि दुसरीकडे लाडक्या बहिणींचा आणि सुनांचा अपमान करायचा, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही. एकाही भाजप नेत्यानं या विधानाबद्दल महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली नाही असं म्हणत पृथ्वीराज चव्हाणांनी भावना व्यक्त केल्या. एकूणच जयश्री थोरात यांच्यावर झालेल्या टीकेनंतर विखे समर्थक भाजपचे नेते वसंतराव देशमुख आणि खुद्द सुजय विखे यांच्यावर टीकेचा वर्षाव झाला.
