मोठी बातमी! भाजप नगर जिल्ह्यातील “या” मतदारसंघातील उमेदवार बदलणार?

अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना भाजपकडून नगरच्या श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलला जाण्याची शक्यता आहे. श्रीगोंदा मतदारसंघातून भाजपने बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिली होती.

मात्र, पाचपुते दाम्पत्य हे त्यांचा मुलगा विक्रमसिंह पाचपुते यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. परंतु, भाजप नेतृत्व प्रतिभा पाचपुते यांच्या उमेदवारीवर ठाम राहिले होते. परंतु, आता या निर्णयात बदल होण्याची शक्यता आहे.

यासाठी पाचपुते दाम्पत्य रविवारी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. काही दिवसांपूर्वीही पाचपुते दाम्पत्य मुलाला उमेदवारी मिळावी, ही मागणी घेऊन सागर बंगल्यावर पोहोचले होते. मात्र, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उमेदवार बदलण्यास नकार दिला होता. मात्र, आता पाचपुते दाम्पत्य उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मुलाच्या उमेदवारीसाठी पुन्हा एकदा लॉबिंग करणार आहेत. श्रीगोंद्यात भाजपने ऐनवेळी उमेदवार बदलला तरी फटका बसणार नाही. उलट मतांची संख्या वाढेल, असा विश्वास बबनराव पाचपुते यांनी व्यक्त केला.

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात भाजपकडून सुवर्णा पाचपुते यादेखील उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही होत्या. मात्र, भाजप नेतृत्त्वाने जयश्री पाचपुते यांच्या पारड्यात दान टाकल्यानंतर त्या नाराज झाल्या होत्या. मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडून भाजपने उमेदवारी न देता बाहेरून पक्षात आलेल्या प्रस्थापितांनाच पक्षाकडून उमेदवारी दिली जाते, अशी टीकाही त्यांनी केली होती. त्यामुळे आता भाजपने उमेदवार बदलून विक्रमसिंह पाचपुते यांना रिंगणात उतरवल्यास सुवर्णा पाचपुते काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल.

Leave a Comment