नगर – रेखा जरे हत्याकांडातले सरकारी साक्षीदार डॉ. विजय मकासरे यांना बुलेटवरुन आलेल्या दोघा अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली.
रविवार (दि. ६) दुपारी रेखा जरे हत्याकांडातले सरकारी साक्षीदार डॉ. मकासरे हे महत्त्वाच्या कामानिमित्त अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाहून शेंडी बायपासमार्गे एमआयडीसीकडे जात होते.
यावेळी विनानंबरच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा हेल्मेटधारी अज्ञात व्यक्तीने डॉ. मकासरे यांची कार अडवली. डॉ. मकासरे यांना त्या दोघांपैकी एक जण म्हणाला, ‘तु रेखा जरे हत्याकांडात सरकारी साक्षीदार आहे ना? आमच्या बाजूने साक्ष दे. आमच्या विरोधात साक्ष दिल्यास तुला ट्रकनं उडवून देऊ’, अशी धमकी देत ते अज्ञात इसम तिथून निघून गेले. डॉ. मकासरे यांनी घडलेल्या प्रकारासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीनुसार पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.
