सुजय विखे म्हणाले, “त्या” सभेमुळे संगमनेरमधील संधी हुकली

सुजय विखे शिराळ चिंचोडी येथे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डीले यांच्या प्रचारार्थ एक जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत सुजय विखे यांनी जोरदार भाषण केले. त्यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. तसेच महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्यावं, असं आवाहन केलं. यावेळी बोलताना त्यांनी स्वत:विषयी सांगताना मिश्किल भाष्य केलं. लोकसभा निवडणुकीपासून माझे ग्रहमान काही ठीक नाहीत, असं सुजय विखे पाटील म्हणाले. “लोकसभा निवडणुकीत मार्चपर्यंत चांगलं वातावरण असताना नंतर अचानक काय झालं माहिती नाही. माझा पराभव झाला,” असं सुजय विखे म्हणाले.

तसेच, माझं कुठे काही शिजायला लागलं की कुणीतरी पातेल्याला लाथ मारतंय. संगमनेरमध्ये देखील आपल्या सभांना गर्दी पाहून सर्वांना वाटलं की मी आमदार होणार. तशी चर्चा सुरू झाली. मात्र वसंत देशमुखांनी शिजलेल्या पातेल्याला लाथ मारली, असं सांगत सुजय विखेंनी संगमनेर येथील सभेदरम्यान झालेल्या सभेची आणि गोंधळाची आठवण काढत चांगलीच टोलेबाजी केली. विखे यांच्या हा विधानानंतर सभेत चांगलाच हशा पिकला.

दरम्यान, सुजय विखे यांनी या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची तयारी चालू केली होती. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून आमदार होण्यासाठी ते प्रयत्नरत होते. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे एका विराट सभेचे आयोजन केले होते. मात्र या सभेत वसंत देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. देशमुख यांच्या विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठा गजहब उडाला होता. त्यानंतरची स्थिती लक्षात घेता विखे यांना संगमनेरमधून तिकीट मिळालं नाही. असं असलं तरी शिराळ चिंचोडीच्या सभेत झालं ते झालं आपण काय थकलेलो नाहीत. आपण पुन्हा जोमाने काम करू, असं म्हणत सुजय विखे यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचेही संकेत दिले आहेत. त्यामुळे भविष्यात विखे यांना भाजपाकडून पुन्हा संधी मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Comment