भाजप नेत्यान मविआच्या सभेची एका वाक्यात उडवली खिल्ली, म्हणाले….

महाविकास आघाडीची काल संभाजीनगरात मोठी सभा पार पडली. या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. मराठवाड्याने पाहिली नाही अशी ही सभा होती.

या सभेतून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला.

महाविकास आघाडीच्या या शक्तीप्रदर्शनामुळे संभाजीनगरातीलच नव्हे तर राज्यातील राजकारण ढवळून निघालेलं असतानाच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी आघाडीच्या सभेची खिल्ली उडवली आहे. आओ चोरो, बांधो भारा, आधा तुम्हारा, आधा हमारा, अशी ही सभा होती, असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी सभेची खिल्ली उडवली आहे.

रावसाहेब दानवे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांना कालच्या संभाजीनगरमधील सभेबाबत छेडलं. त्यावर रावसाहेब दानवे यांनी खास आपल्या शैलीत टीका केली.

संभाजीनगरात आओ चोरो बांधो भारा, आधा तुम्हारा, आधा हमारा… अशी या तिघांची अवस्था आहे. तिघे मिळून एवढी सभा होत असतील तर एकटी भाजपही एवढी सभा घेऊ शकते. तिघांची मिळून ती सभा आहे. आम्हीही शक्तीप्रदर्शन करू. राजकारणात शक्तिप्रदर्शन करणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं कामच आहे, असं रावसाहेब दानवे म्हणाले.

Leave a Comment