मुंबई : आदिवासींच्या प्रश्नासाठी लढणारे, ग्रामीण विकासात भरीव योगदान देणारे ज्येष्ठ नेते, मधुकर पिचड यांचे दीर्घ आजाराने निधन. नाशिकच्या खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अतिशय निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी म्हणून पिचड यांची ओळख होती.
शरद पवार यांनी १९९९ ला काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादीची स्थापन केली. मधुकर पिचडही राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक. शरद पवार यांना अहमदनगर जिल्ह्यातून त्यांची वेळोवेळी साथ लाभली. आक्रमक पण तितकेच संयत, जनहिताच्या प्रश्नांवर पिचड यांनी नेहमीच आवाज उठवला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते ते विविध खात्यांचे मंत्री म्हणून पिचड यांनी काम केले. शरद पवार यांनी त्यांच्या कामावर प्रभावित होऊन त्यांना राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची संधी दिली. पिचड यांच्या जाण्यानंतर पवार अतिशय भावुक झाले.
“मधुकर पिचड हे आमच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांपैकी एक. आदिवासी समाजासाठी त्यांनी आपले आयुष्य दिले. अलीकडच्या काळात त्यांची प्रकृती बरी नव्हती. आजारावर मात करून ते पुन्हा सार्वजनिक जीवनात सक्रीय होतील, असा आम्हाला विश्वास होता पण आज दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा करण्यासाठी ज्या लोकांनी प्रचंड कष्ट केले, त्याच्यामध्ये मधुरकररावांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर त्यांच्याकडे पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी होती. ती त्यांनी उत्तमरित्या सांभाळली. विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. ज्यावेळी सत्तेत गेले, त्यावेळी आदिवासी समाजासह इतर मागास समाजांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली. उत्तम काम करणारा सहकारी हरपल्याचे दु:ख आहे”, अशा भावना शरद पवार यांनी व्यक्त केल्या.
आपल्या राजकीय कारकीर्दीत आदिवासी समाजाचे स्थान आणि आवाज बळकट करण्यात त्यांची मोलाची साथ लाभली. त्यांची ही कारकीर्द नेहमीच स्मरणात राहील, अशा भावना शरद पवार यांनी एक्स माध्यमावर पोस्ट करून व्यक्त केल्या. पिचड यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करुन माझ्या सहकाऱ्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले.
