तर राम शिंदे तुम्ही सभापती झाले नसता, अजितदादा असं का म्हणाले…

नागपूर : महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सभापतीपदी भाजपचे राम शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. महाविकास आघाडीकडून कोणीही उमेदवारी दाखल न केल्याने राम शिंदे यांची बिनविरोध निवड झाली.

मागील अनेक महिन्यांपासून राज्याच्या विधान परिषदेच्या सभापतींची जागा रिक्त होती. अखेर राम शिंदे यांना ही संधी देण्यात आली. यावेळी राम शिंदे यांच्या अभिनंदनपर भाषण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिश्किल टिप्पणी केली.

विधान परिषदेच्या सभापतीपदी शिवसेनेने दावा केला होता. मात्र, भाजपने ही मागणी फेटाळली आणि राम शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली. राम शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या अभिनंदनापर भाषण झाले. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत भाषण केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात म्हटले की, विधानसभेचे अध्यक्ष देखील तरुण आहेत तर परिषदेत देखील तरुण सभापती बसवले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्याबद्दल सांगितलं मात्र आपण अजूनही चाळीशीत आहात, असेच वाटत आहे, असे त्यांनी म्हटले. राम शिंदे सर तुम्ही म्हणालात अजित पवारांनी माझा इथ सभा घेतली नाही. माझ्यामुळे पराभव झाला असं आपण बोललात. मात्र, जे झालं ते चांगल झालं आपण सभापती झालात, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी केली.

राम शिंदे हे कर्जत-जामखेड मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीत उभे होते. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पवार यांच्याकडून राम शिंदे यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनी रोहित पवार यांना अजित पवारांनी माझी सभा झाली नाही, म्हणून वाचलास असे म्हटले होते.

Leave a Comment