प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील(Goutami Patil) हिच्यावर इंदुरीकर महाराज यांनी टीका केली होती. गौतमी पाटील तीन गाण्यासाठी तीन लाख रुपये घेते. आम्ही फक्त 5 हजार रुपये वाढवून मागितले तर बाजार मांडल्याचा आरोप होतो. गौतमीच्या कार्यक्रमात राडा होतो. मुलांचे ढोपर फुटतात. पोलिसांना बंदोबस्त ठेवावा लागतो. गौतमीला संरक्षण दिलं जातं. आम्हाला संरक्षण नसतं, अशी टीका इंदुरीकर महाराज(Indurikar Maharaj) यांनी केली होती.
इंदुरीकर महाराज यांच्या या टीकेवर गौतमी पाटील हिने काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, सोशल मीडियातून इंदुरीकर महाराज यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. त्यांच्याविरोधातील मिम्सही व्हायरल झाले होते. मात्र गौतमीने पहिल्यांदाच इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला आहे.
ते महाराज आहेत. मी काय बोलणार त्यांच्याविषयी. फक्त गैरसमज नका करू. महाराजांचा गैरसमज झाला आहे. ते सांगतात तेवढं मानधन नाही. हे प्रेक्षकांनी ही ध्यानात घ्यावं. मी तिन गाण्याला तीन लाख रुपये घेतले असते तर लोकांनी माझ्या कार्यक्रमाचे आयोजनच केले नसते.
आमच्या टीममद्ये 11 मुली असतात. एकूण 20 जणांची आमची टीम आहे. या सर्वांचा खर्च मोठा आहे. त्यामुळे मानधन आम्ही घेतो. पण महाराज सांगतात तेवढं घेत नाही. आणि तीन गाण्यासाठी तीन लाख रुपये कोणीही देणार नाही, असं गौतमी पाटील म्हणाले.
माझ्या कार्यक्रमाला मोठी गर्दी होत असते. प्रेक्षक उपस्थित राहून एन्जॉय करतात. इतकी मोठी गर्दी होत असेल तर मी माझ्यासाठी मला संरक्षण मागणारच ना? महाराजच नव्हे तर कुणीही काही बोललं, टीका केली तरी माझं काम सुरू आहे. मला काही अडचण नाही. कारण मी कशी आहे हे माझं मला माहिती आहे.
मी मानधन किती घेते ते मला माहीत आहे. कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना माहीत आहे. आज मी पुन्हा उभी राहीलीय. ती फक्त प्रेक्षकांमुळेच. प्रेक्षकांनी मला कोणत्याही गोष्टी जाणवू दिल्या नाहीत. महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी सपोर्ट केल्यामुळे मी जिद्दीने अडचणीच्या काळात उभा राहिलीय, असंही ती म्हणाली.
