राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने कित्येक महिन्यानंतर एका व्यासपीठावर आले होते. लोकसभा निवडणूक निकालानंतर प्रथमच जाहीर मंचावर बहीण भाऊ एकत्र आल्याने सगळ्यांच्या नजरा दोघांकडे लागलेल्या होत्या. परंतु दोघांनीही एकमेकांशी बोलणे टाळल्याने त्यांच्यातील अबोल्याची चर्चा बारामतीत रंगली.
सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्याचे निमित्त होते बारामतीच्या अंजनगावातील केवी उपकेंद्राच्या उद्घाटनाचे. अजित पवार यांच्या हस्ते केवी उपकेंद्राचे उद्घाटन झाले, या कार्यक्रमाला सुप्रिया सुळे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
एखाद्या कार्यक्रमाला गेल्यावर अधिकाऱ्यांकडून माहिती घेणे, त्यांना कार्यक्रमानुरुप सूचना देणे, उपस्थित छोट्या मुलामुलींशी संवाद करणे हा अजित पवार यांचा स्वभाव आहे. आजही बारामतीमधील कार्यक्रमाला आजीसोबत आलेल्या नातीची माहिती अजित पवार यांनी घेतली. छोट्या चिमुरडीसोबत गप्पा मारताना अजित पवार यांनी नाव काय, कोणत्या वर्गात शिकते, असे प्रश्न विचारले. त्यानंतर उपस्थितांनी चिमुरडीला गाणे म्हणायले सांगितले.
हाय अंगावर खादी, संग कामाची यादी
चिमुरडीनेही अजित पवार यांना समोर पाहून थेट ”हाय अंगावर खादी, संग कामाची यादी, अशी दमदार एन्ट्री आमच्या दादाची, आमचा दादा लै रुबाबदार…” असे गाणे म्हणायला सुरुवात केली. त्यावर ‘हे तुझ्या अभ्यासक्रमात नसेल ना…’ असे म्हणत अजित पवार यांनी चिमुरडीची ‘शाळा’ घेतली.
अजितदादांच्या टिप्पणीवरही खुद्द सुप्रिया सुळे यांनाही हसू आवरता आले नाही. अजितदादांबरोबर त्या ही हसायला लागल्या. उपस्थित लोकांनीही अजित पवार यांच्या हजरजबाबी टिप्पणीला हसून दाद दिली.
