पारनेर(DSNews24/किरण पुरी) दुष्काळी गावांना हक्काचे पाणी मिळण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेने हा लढा उभा केला आहे. गेल्या ४० वर्षांपासून राजकीय नेत्यांनी दुष्काळी गावांना पाण्यापासून वंचित ठेवून फसवणूक केली. हा लढा अधिक तीव्र करण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेना दुष्काळी गावात गाव तिथे कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जोपर्यंत वावरात पाणी येणार नाही तोपर्यंत हा संघर्ष थांबणार नसल्याची भूमिका भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांनी घेतलीय.
पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथे भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने पाणी कृती समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी दुष्काळी गावात गाव तिथे कृती समिती स्थापन करण्याचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर बोलत होते.
या बैठकीत बाळासाहेब पाटील झावरे, मोहन रोकडे, भास्कर गागरे, संतोष वाबळे, रघुनाथ मांडगे, अरूण बेलकर, अब्बास मुजावर, सखाराम ठुबे, सुभाष ठुबे, सुभाष भागवत, राजेंद्र रोकडे, बाळशिराम पायमोडे, अशोक अंधाळे, सुभाष करंजुले, दादाभाऊ सोनवळे, बाळासाहेब वाळुंज, प्रविण खोडदे, अनिल सोबले, चिंतामणी सोनावळे, सुयश वाळुंज, यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संतोष वाडेकर पुढे बोलताना म्हणाले की, दुष्काळी गावांच्या जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न आहे. दुष्काळी गावांना हक्काचे पाणी मिळण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेने हा लढा उभा केला आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, तसेच ४० वर्षात पहिल्यांदाच अहिल्यानगर जिल्ह्याला जलसंपदा खात मिळाले असून पाणीप्रश्न १०० टक्के मार्गी लागेल अशी आशा आहे. मात्र या आधी राजकीय नेत्यांकडून या प्रश्नावर फसवणूक झाली आहे त्यामुळे आपण सर्वांनी एकजुट होऊन संघटीत झाले पाहिजे. तसेच हक्काच्या पाण्यासाठी सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून तन मन धनाने या लढ्यात सहभागी व्हा असे आवाहन संतोष वाडेकर यांनी केले आहे.
गेल्या ४० वर्षांपासून पारनेर तालुक्यातील दुष्काळी गावांना शेतीसाठी कुकडी प्रकल्पातून हक्काचे पाणी मिळावे अशी जनतेची मागणी आहे. पण अद्यापपर्यंत कोणतीच योजना कार्यान्वित झाल्या नाही. तसेच सर्वच राजकीय पुढार्यांनी नुसते आश्वासन देऊन फसवणूक केली असल्याच्या भावना जनतेमध्ये झाल्या आहेत. मात्र भूमिपुत्र शेतकरी संघटनेने हा जिव्हाळ्याचा प्रश्न हातात घेत पूर्ण ताकतीनिशी मैदानात उतरली आहे. दरम्यान या विषयावर भूमिपुत्र शेतकरी संघटनेने विधानसभेपूर्वी लोकशाही मार्गाने हक्काच पाणी मिळण्यासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. त्यामुळे संपूर्ण तालुका ढवळून निघाला होता. मात्र हा लढा अधिक तीव्र करण्यासाठी गणपती चौफुला कान्हूर पारनेर रोड या ठिकाणी बैठक आयोजित केली होती. यावेळी गाव तिथे कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर कान्हूर पठार या ठिकाणाहून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आलाय. आता दुष्काळग्रस्त गावात गाव तिथे कृती समिती स्थापन केली जाणार आहे. तसेच पाण्यासाठी आगामी काळात हा लढा अधिक तीव्र होणार आहे.
