पारनेर(DSNews24/किरण पुरी) अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड धरणाच्या लाभक्षेत्रात जांबुत, टेकडवाडी, साकूर, मांडवे या चार बंधाऱ्यांचा समावेश करावा तसेच कान्हूर पठार, पुणेवाडी, राळेगणसिद्धी, जातेगाव उपसासिंचन योजनांना मान्यता देऊन कार्यान्वित करण्यात यावे व गोदावरी खोऱ्यात बंधारे बांधण्यासाठी असलेली बंदी उठवून तांबडी कार धरण बांधण्यात यावे या मागण्यांचे निवेदन भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांनी राज्याचे जलसंपदामंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे) ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहे.
यावेळी बाळासाहेब पाटील झावरे, मोहन रोकडे, भास्कर गागरे, सिताराम देठे, संतोष वाबळे, रघुनाथ मांडगे, अरूण बेलकर, अब्बास मुजावर, सखाराम ठुबे, सुभाष ठुबे, सुभाष भागवत, राजेंद्र रोकडे, बाळशिराम पायमोडे, अशोक अंधाळे, सुभाष करंजुले, दादाभाऊ सोनवळे, बाळासाहेब वाळुंज, प्रविण खोडदे, अनिल सोबले, चिंतामणी सोनावळे, सुयश वाळुंज, यांच्यासह खडकवाडी, पळशी येथील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, पिंपळगाव खांड धरणाच्या लाभक्षेत्रात एकूण १४ बंधारे आहे. यामध्ये १० बंधाऱ्यांचाच या धरणाच्या लाभक्षेत्रात समावेश आहे. दरवर्षी या धरणाचे रोटेशन फक्त आभाळवाडीपर्यंतच सोडले जाते. मात्र जांबुत, टेकडवाडी, साकूर, मांडवे या चार बंधाऱ्यांचा लाभक्षेत्रात समावेश नसल्याने ते भरून मिळत नाही. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात शेती व पिण्याच्या पाण्याचे जलसंकट उभे राहते. त्याचबरोबर ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठा योजना देखील बंद पडल्या जातात. त्यामुळे पठार भागातील मुळानदी काठची गावे पाण्यापासून वंचित राहतात.
त्यामुळे या चार बंधाऱ्यांचा लाभक्षेत्रात समावेश करून हा प्रश्न कायमचाच मार्गी लावावा. तसेच कान्हूर पठार, पुणेवाडी, राळेगणसिद्धी, जातेगाव उपसासिंचन योजनांना मान्यता देऊन कार्यान्वित करण्यात यावे व गोदावरी खोऱ्यात बंधारे बांधण्यासाठी असलेली बंदी उठवून तांबडी कार धरण बांधण्यात यावे असे भूमिपुत्र शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
