सध्या राजकीय दृष्ट्या अडचणीत सापडलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांना आणखी एक धक्का बसला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून धनंजय मुंडे यांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत.
आता वांद्रे फॅमिली कोर्टाने धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना महिना पोटगीपोटी 2 लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहोत असा करुण शर्मा यांचा दावा होता. त्यासाठी मागच्या काही वर्षापासून त्या कायदेशीर लढाई लढत होत्या.
कौटुंबिक विषय असल्याने त्यांनी वांद्रे फॅमिली कोर्टात दाद मागितली होती. दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून घेतला. फॅमिली कोर्टाने धनंजय मुंडे यांना दर महिना पोटगीपोटी करुणा शर्मा यांना 2 लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप केले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी वारंवार काही गोष्टी समोर आणल्या होत्या. त्याचवेळी त्या कायदेशीर लढाई सुद्धा लढत होत्या. आज त्यांना थोडा दिलासा मिळाला असं म्हणावं लागेल.
