Durga Bhosale-Shinde : युवा शिवसेना सचिव दुर्गा भोसले – शिंदे यांचे काही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दुर्गा यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू अशी दुर्गा भोसले – शिंदे यांची ओळख होती. युवा शिवसेनेच्या माध्यमातून राज्यभरात संघटनात्मक बांधणीत त्यांचा मोठा हातभार होता. त्यांच्या जाण्याने ठाकरे गटाचे मोठे नुकसान झाले आहे. वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी त्यांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दुर्गा भोसले-शिंदे यांच्या पश्चात पती, आई, वडील केशवराव भोसले आणि भाऊ असा परिवार आहे.
ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिलांकडून मारहाण केली. मात्र, पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही. उलट त्यांच्यावरच गुन्हा दाखल केला. याविरोधात महाविकास आघाडीने ठाण्यात मोर्चा काढला.
आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात ठाण्यात निघालेल्या जनआक्रोश मोर्चात युवासेना सचिव दुर्गा भोसले-शिंदे सहभागी झाल्या होत्या. मात्र यावेळी चालताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तातडीने मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल येथे दाखल केले होतं. मात्र उपचार सुरु असतानाच त्यांचे निधन झाले.
दुर्गा यांच्या निधनाचे वृत्ताने मन सुन्न झाले आहे. आमचा एक अत्यंत मेहनती आणि दयाळू युवासैनिक आम्ही आज गमावला आहे. युवासेना परिवाराला झालेला शोक व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. ओम शांती’ , असे म्हणत माजी मंत्री आणि युवानेते आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलेय.
