सिल्लोड : तालुका कृषी अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून कृषी सहाय्यकाने कृषी कार्यालयातच जीवन संपवल्याचा खळबळजनक प्रकार सिल्लोडमध्ये घडला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड शहरातील तालुका कृषी कार्यालयात कर्मचाऱ्याने टोकाचं पाऊल उचललं आहे.
सिल्लोड शहरातील तालुका कृषी कार्यालयात कृषी सहाय्यक योगेश शिवराम सोनवणे यांनी गळफास लावून घेतला. तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर शामलाल बरधे आणि कृषी सहाय्यक किशोर उत्तमराव बोराडे यांच्या जाचाला कंटाळून योगेश सोनवणे यांनी गळपास लावून घेतला आहे.
ज्ञानेश्वर बरधे आणि किशोर बोराडे यांनी संगनमत करून योगेश सोनवणे यांना ड्युटीवर असताना अपमानित वागणूक दिली, तसंच मानसिक त्रासही दिला. याशिवाय सुट्टीच्या दिवशी अतिरिक्त काम लावलं, या त्रासाला कंटाळून योगेश सोनवणे यांनी गळफास लावून घेतला, असा आरोप योगेश यांच्या घरच्यांनी केला आहे. योगेश यांच्या कुटुंबाने दिलेल्या फिर्यादीच्या आधारे सिल्लोड शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
