जुन्नर : शिजन्मभूमी जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेना पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २८ फेब्रुवारीला नारायणगाव येथे कार्यकर्ता मेळाव्यात ते शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत.
शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने शिवसेनेत निर्माण झालेली पोकळी सोनवणे भरून काढण्याचा प्रयत्न करतील.
जुन्नर विधानसभेत यंदा तिरंगी लढत झाली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून सत्यशील शेरकर, अजित पवार गटाकडून अतुलशेठ बेनके तर अपक्ष म्हणून शरद सोनवणे यांनी निवडणूक लढवली. तिरंगी लढतीत शरद सोनवणे यांनी विजयाची गुलाल उधळून दुसऱ्यांदा विधानसभेत प्रवेश केला. निकालानंतर त्यांनी तत्काळ शिंदे शिवसेनेला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केला. आता तीन महिन्यातच त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
आढळराव पाटील राष्ट्रवादीत, नुकसान भरून काढण्यासाठी शरद सोनवणे शिंदे सेनेत
शरद सोनवनेंची विधानसभा निवडणूक काळात शिंदे गटाच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर शिंदे गटाचे फारसे अस्तित्व नव्हते. येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार असल्याने शिंदे सेनेला चांगले यश मिळावे, यासाठी आम्ही जोरदार प्रयत्न करू, असे शरद सोनवणे म्हणाले.
एकनाथ शिंदे यांचा जुन्नर दौरा
शरद सोनवणे येत्या २८ फेब्रुवारीला नारायणगाव येथे कार्यकर्ता मेळाव्यात एकनाथ शिंदेच्या उपस्थित शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार आहेत. यावेळी शिरूर लोकसभेतील विविध विधानसभा मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते त्यांच्यासोबत शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. एकनाथ शिंदे जुन्नरला जाणार असल्याने सोनवणे मोठे शक्तिप्रदर्शन करणार आहेत.
