देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री…..

मुंबई : ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणे अशक्य आहे. येत्या काळात सध्याच्या सरकारमध्ये कोणताच बदल होणार नसून एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील’, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केला.

मुंबईत एका वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागणे बाकी आहे. त्याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता फडणवीस त्यांनी नवे राजकीय भाकित केले.

‘उद्धव ठाकरे हे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत. त्यामुळे त्यांचे सरकार परत येऊ शकणार नाही. मी वकील आहे. मी हे सांगू शकतो की, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालय त्यांना परत सत्तेत आणून बसवणार नाही. ज्यांनी सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी पाहिली आहे, त्यांच्याही ही बाब लक्षात आली असेल.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत अंदाज बांधणे योग्य नाही. मात्र, आमच्या भूमिकेनुसार वाटते की निकाल योग्य पद्धतीने लागेल. आजच माझे भाकीत सांगतो, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातच आम्ही निवडणुकांना सामोरे जाऊ. त्यामुळे हे सरकार स्थिर आहे. या सरकारमध्ये कोणताही बदल होणार नाही’, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment