सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आलाय. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजप-काँग्रेस नेत्यांचे एकत्रित पॅनल करण्यात आलाय.
काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, काँग्रेस नेते बाळासाहेब शेळके यांचा भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला पाठिंबा असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
भाजपचे आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांना देखील सोबत येण्याचे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केलं आहे. पण माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख हे पुन्हा एकदा स्वतंत्र लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागच्या निवडणुकीच्या वेळेस ही तत्कालीन पालकमंत्री भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पॅनलला काँग्रेस नेते दिलीप माने यांनी दिला पाठिंबा होता. तर आमदार सुभाष देशमुख हे विरोधी पॅनलमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
