संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर येथील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा रस्ता असणाऱ्या साकूर ते बिरेवाडी ५ किलोमीटर रस्त्याच्या सीमेंट काँक्रिटीकरणासाठी जवळपास पावणे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन होऊन पाच महिने झाले आहे. मात्र अजूनही रस्ताच काम ठेकेदाराने चालू केले नसल्याने नागरिकांनी रस्त्याचे काम लवकरात लवकर चालू करावे अशी मागणी केली होती. मात्र आता याकडे संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी स्वतः लक्ष घातले आहे. तसेच जर येत्या १५ दिवसांत ठेकेदाराने काम चालू केले नाही तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असा थेट इशारा आ. अमोल खताळ यांनी दिला आहे.
नुकतेच आ. अमोल खताळ यांनी पठार भागातील शेळकेवाडी, कौठेमलकापूर, बिरेवाडी ( ढुमके वस्ती) या गावांमध्ये दौरा केला होता. या दौऱ्यातील बिरेवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहात त्यांनी भेट दिली होती. यावेळी साकूर – बिरेवाडी रस्त्याबाबत उपस्थित नागरिकांसमोर स्पष्टच सांगितले.
यावेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब खेमनर, युवा नेते गुलाबराजे भोसले, भाजप नेते रऊफ शेख, बुवाजी खेमनर, रविंद्र दातीर, संदिप खिलारी, गणेश डोंगरे, मयुर गुळवे, नवनाथ गंभीरे, लालू साळुंके, सोमनाथ बारवे, भाऊसाहेब गळंगे, आण्णा ढेंबरे, बाळासाहेब गळंगे, डॉ. संतोष वर्पे आदि उपस्थित होते.
साकूर – बिरेवाडी रस्ता अत्यंत महत्त्वाचा आणि मधला मार्ग समजला जातो. या रस्त्याचा प्रवासी, वाहनचालक मोठ्या प्रमाणात वापर करत असतात. त्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याच्या कामासाठी मागणी होत होती. मात्र शेवटी या रस्त्यासाठी सीमेंट काँक्रिटीकरणासाठी पावणे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला.
परंतु रस्ता मंजूर होऊनही ठेकेदाराने कामच चालू केले नाही. त्यामुळे ठेकेदाराविरोधात ग्रामस्थांमध्ये मोठी नाराजी पसरली होती. मात्र आ. अमोल खताळ यांनी या विषयाची गंभीर दखल घेऊन जर पंधरा दिवसांत रस्त्याचे काम सुरू केले नाही तर ठेकेदारावरच कारवाई करण्याचा इशारा आ. खताळ यांनी दिलाय.
