संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथे जवळपास १३ कोटी रुपयांचे जल जीवन योजनेचे काम सुरू आहे. मात्र सदर काम ठेकेदार देवानंद जाधव हे इस्टीमेटनुसार करत नसून कामच निकृष्ट दर्जाचे झाले असून या कामाची चौकशी करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य तुषार एकनाथ धुळगंड यांनी केलीय. याबाबत निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधित विभागांना देण्यात येणार आहे. अशी माहिती DSNews24 शी बोलताना तुषार धुळगंड यांनी दिलीय.
निवेदनात म्हटले आहे की, मांडवे बुद्रुक गावात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत जल जीवन योजनेचे जवळपास १३ कोटी रुपयांच काम सध्या सुरू आहे. तसेच हे काम संकेत एंटरप्रायजेसने घेतले असून ठेकेदार देवानंद जाधव आहे. परंतु हा ठेकेदार अत्यंत मनमानी पद्धतीने काम करत आहे. तसेच इस्टीमेटनुसार काम करत नाही. मी ठेकेदाराकडे इस्टीमेट मागितले असता तो अरेरावीची भाषा करून तुला इस्टीमेटची काय गरज आहे अशी भाषा वापरत आहे.
मी काम चेक केले असता बऱ्याच ठिकाणी इस्टीमेटनूसार ३.२५ इंच फुटीच खोदकामाची आवश्यकता असताना फक्त १.५० इंचच खोदकाम करून काम करत आहे. तसेच पाण्यासाठी टाकी बांधली असून सदर टाकिचे तर अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे. बऱ्याच ठिकाणी चिरा पडल्या आहेत. त्यामुळे सदर टाकी कधीही कोसळू शकते. मात्र सदर ठेकेदार कुणाचच ऐकत नसल्याने कामात मोठी अफरातफर करत आहे.
तसेच काही ठिकाणी संबंधित विभागाची परवानगी न घेता शासकीय मालमत्तेचे नुकसान करत अक्षरशः रस्ता फोडून तेथून काम करत आहे. यासाठी ठराविक लोकांना हाताशी धरून तो काम उरकून घेताना दिसत आहेत. मात्र मांडवे बुद्रुक गावाच्या ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटावा म्हणून शासनाने ही योजना आणली आहे. मात्र असे निकृष्ट दर्जाचे काम होत असतील तर ही योजनाच बंद का करू नये. तसेच या कामात ठेकेदाराने स्वतःचा फायदा बघितला आहे. त्यामुळे या ठेकेदाराचे उर्वरित पेमेंट तातडीने थांबवून कामाची तात्काळ चौकशी करण्यात यावी अन्यथा मांडवे बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने मोठ जन आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.
