नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०२२ मध्ये व्हायला पाहिजे होत्या. मात्र, आता २०२५ उजाडले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील नाशिकमधील एका कार्यक्रमात बोलताना सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात निवडणुका घेण्याच्या सूचना दिल्याची माहिती दिली.
तसेच या निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. त्यासाठी तयारीला लागा, असे आदेश देखील अजित पवार यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिले आहेत. उपमुख्यमंत्री पवार रविवारी (दि. १८) नाशिक जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी कळवण तालुक्यात शेतकरी मेळावा तसेच इतर कार्यक्रम घेतले. पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्पटेंबर-ऑक्टोबर महिन्यात घेण्याच्या सूचना केल्याची माहिती दिली. आहे
राज्यात सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी इतर कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी पंचायत समित्या, जिल्हा परिषदा उभारल्या. त्या माध्यमातून पुढे आलेले नेतृत्व हे राज्यात आणि देशात विविध पदांपर्यंत पोहोचल्याचे पाहिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने पुढील चार महिन्यांत निवडणुका घ्या, असे निर्देश दिल्याचा संदर्भ त्यांनी या वेळी दिला.
