सत्यजित तांबेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर सुजय विखेंच मोठं विधान, म्हणाले….

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत.

त्यातच सत्यजीत तांबे यांनी अलीकडेच केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. माझा भाजप पक्ष प्रवेशाचा अजून काही विषय नाही. देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. जे लोक मला मार्गदर्शन करतात ते सांगतील मला कधी काय करायचं. मी सध्या अपक्ष आहे आणि अपक्षचं चांगलं आहे, असे सूचक वक्तव्य सत्यजीत तांबे यांनी एका मुलाखतीत केले. आता यावरून भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी भाष्य केले आहे.

सुजय विखे पाटील म्हणाले की, याबाबत मुख्यमंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. कोणाशीही मैत्री ही मैत्रीच्या जागेवर असते. आम्ही देखील भाजपमध्ये आलो त्यावेळेस काही लोकांना आवडलं नसेल. मात्र, पक्षाने त्यावेळी योग्य तो निर्णय घेतला. त्यामुळे कोणी नवीन येत असेल तर त्याला मी विरोध करणे संयुक्तिक होणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

सुजय विखे पाटील पुढे म्हणाले की, संगमनेर तालुक्याच्या प्रश्नांमध्ये आम्ही मागे हटणार नाही. भविष्यात एका पक्षात असलो तरी स्थानिक राजकारण हे वेगळं असतं ते कायम राहील. कोणी पक्षात आलं किंवा नाही आलं तरी आमच्यात पन्नास वर्षात जे राजकारण झालं ते यापुढेही सुरूच राहील. मामा, भाचे, पुतणे कोणीही आलं तरी जनतेच्या हितासाठी आम्हाला जे योग्य वाटतं ते आम्ही करत राहणार आहोत, असे देखील त्यांनी म्हटले आहे

Leave a Comment