गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेले नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनचे राज्यात रविवारी (दि.25) आगमन झाले. हवामान खात्याकडून रविवारी यासंदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात आली. कालच मान्सून केरळात दाखल झाला होता.
त्यानंतर मान्सून महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी एक ते दोन दिवस जातील, असा अंदाज होता. मात्र, महाराष्ट्रात मान्सूनसाठी अत्यंत पोषक स्थिती असल्याने अवघ्या काही तासांमध्ये मान्सून राज्यात दाखल झाला आहे. काही वेळात हवामान याबाबतची अधिकृत घोषणा करणार आहे.
यंदा मान्सून 12 दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल
दरवर्षी मान्सून साधारणपणे 7 जूनच्या आसपास राज्यात दाखल होतो. मात्र, यंदा मान्सून 12 दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मान्सूनची एकूण आगेकूच पाहता पुढील काही तासांमध्ये मान्सून मुंबई आणि पुण्यात दाखल होईल, असा अंदाज आहे. आज सकाळपासून मुंबई, उपनगर आणि ठाणे परिसरात ढगाळ वातावरण आहे.
