मोठी बातमी! ठाकरे गटातून “या” दिग्गज नेत्याची हकालपट्टी 

नाशिक – ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड आणि जिल्हाप्रमुख डी.जी. सूर्यवंशी यांनी दिली. यावेळी उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात बडगुजर यांच्या हकालपट्टीचे स्वागत केले.

सुधाकर बडगुजर यांनी पक्षविरोधी वक्तव्य केल्यामुळे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही कारवाई केली असल्याची माहिती यावेळी दत्ता गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच आमचा पक्ष आदेशावर चालतो असे म्हणत गायकवाड यांनी भर पत्रकार परिषदेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांचा फोन आल्याचे सांगत बडगुजर यांच्या हकालपट्टीची घोषणा केली.

दरम्यान, कालच सुधाकर बडगुजर यांनी माध्यमांशी बोलतांना पक्षात संघटनात्मक बदल झाल्यापासून पक्षात अनेकजण नाराज आहेत. तसेच माझी नाराजी कोणावरही नसून स्वतःवरच आहे, असे म्हटले होते. त्यानंतर अखेर आज ठाकरेंच्या शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली.

Leave a Comment