नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके हे आपल्या साधेपणामुळे ओळखले जातात. थेट कार्यकर्त्यांमध्ये मिसळणारे नेते म्हणून देखील त्यांचे कौतुक केले जाते. ते आमदार असताना आमदार निवासात कार्यकर्ते बेडवर झोपलेले आणि ते खाली अंथरुणावर जमिनीवर झोपल्याचे फोटो व्हायरल झाले होते. आता पुन्हा तसाच प्रकार नाशिकमधील रामशेज किल्ल्याच्या पायश्याशी असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत घडला.
शनिवारी रात्री निलेश लंके यांनी आपला मुक्काम रामशेज किल्ल्याच्या पायश्याशी असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत केले. जमिनीवर अंथरुण टाकून ते आपल्या कार्यकर्त्यांसह झोपले. खास मोहिमेसाठी लंके रामशेज किल्ल्यावर आले आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसा असलेल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा उपक्रम सुरू केला आहे.त्या उपक्रमा अंतर्गत आज (रविवार) छत्रपती संभाजी महाराजांच्या जाज्वल्य पराक्रमाचे प्रतिक असलेल्या रामशेज किल्ल्यावर स्वच्छता मोहीम तसेच संवर्धन आणि वृक्षारोपण उपक्रम राबवले जाणार आहेत.
विशेष म्हणजे मोहिमेसाठी खासदार लंके येणार असल्याने यांच्या स्वागताचे शनिवारी सायंकाळी जोरदार तयारी करण्यात आली होती. रामगृहावर त्यांच्यासाठी कक्षही राखीव ठेवण्यात आला होता. मात्र खासदार लंके आणि खासदार भास्कर भगरे यांनी आपल्या साधेपणाचा प्रत्यय देत चक्क किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या आशेवाडी (दिंडोरी) येथील जिल्हा परिषद शाळेच्या खोलीत मुक्काम केला. त्यांच्या या मुक्कामामुळे परिसरात वास्तव्याला आलेल्या मावळ्यांचाही हुरूप वाढला.
खासदार लंके यांच्या या उपक्रमाला जिल्ह्यातील खासदार भास्कर भगरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आपला सक्रिय पाठिंबा दिला आहे.
