संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर येथील विद्या प्रबोधिनी प्रशाला नेहमीच वेगवेगळे उपक्रम शाळेत राबवत असते. मात्र आता एक अनोखा उपक्रम या शाळेत राबविण्यात येत आहे. इयत्ता पाचवी, सहावी व सातवीच्या वर्गासाठी वर्ग प्रतिनीधींची निवड करण्यासाठी लोकशाही पद्धतीने मतदान घेऊन निवड करण्यात येणार आहे. ३ जुलै २०२५ रोजी ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
इयत्ता पाचवी, सहावी व सातवीच्या वर्गप्रतिनीधींसाठी २१ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहे. त्यासाठी नामनिर्देशन पत्र देखील उमेदवारांनी दाखल केले आहे. अगदी विद्यार्थ्यांचे नामांकन भरून घेण्यापासून ते चिन्ह वाटप करणे, डिपॉझिट घेणे, निवडणुका अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे पर्यंत प्रक्रिया करण्यात आली आहे. तसेच या निवडणुकीसाठी आचारसंहिता देखील लागू करण्यात आली आहे. ३ जुलै रोजी मतदान होणार असून ४ जुलै रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
मात्र मतदानाला अवघा एक दिवस बाकी असताना विद्यार्थी उमेदवारांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक आगळीवेगळी चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे ४ जुलै रोजी समजणार आहे. मात्र सध्या तरी एक राजकीय वातावरण विद्या प्रबोधिनी प्रशालेत तापलं असल्याची चर्चा सुरू आहे.
